Panchkarma in marathi

डॉ. सिद्धार्थ परचुरे

आयुर्वेदिक पंचकर्म दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. केवळ आजारी व्यक्तीच नव्हे, तर इतरही मंडळी रोजच्या धावपळीमुळे येणारा ताण घालवण्यासाठीही पंचकर्माचा आधार घेताना दिसतात. असे असले तरी पंचकर्माचे टप्पे कोणते, कोणत्या आजारावर कोणते कर्म चालते, अशा प्रश्नांची उत्तरे सर्वाना माहिती असतातच असे नाही. पंचकर्माविषयीच्या अशा साध्या गोष्टींची ओळख करून देणारे हे पाक्षिक सदर.

आयुर्वेदात पंचकर्म ही अर्धी चिकित्सा मानली गेली आहे. पंचकर्म म्हणजे त्यात पाच कर्मे असणात हे तर उघड आहे. पण या पाच कर्माच्या आधी आणि नंतरही काही टप्पे असतात. मुख्य कर्मात काही उपकर्मे असतात. शिवाय पंचकर्म करून घेणाऱ्याला यातील पाचही कर्मे करून घ्यावी लागतात, असे मुळीच नाही. रुग्णाची प्रकृती बघून त्याला कोणत्या कर्माची गरज भासेल हे ठरवले जाते.

पाच मुख्य कर्मे :

वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण ही पाच मुख्य कर्मे आहेत. पण त्याचे उपचार घेण्यापूर्वी स्नेहन व स्वेदन ही पूर्वकर्मे केली जातात. स्नेहनात अभ्यंग- अर्थात शरीराला तेल लावणे आणि वैद्याच्या सल्ल्यानुसार पातळ तुपाचे सेवन करून शरीरात स्निग्धता निर्माण करणे हे सांगितले जाते, तर स्वेदन म्हणजे वाफ घेणे.

वमन

कफप्रधान विकारांसाठी वमन हे कर्म केले जाते. यात तोंडाद्वारे औषधी काढा देऊन तोंडावाटेच (उलटी करवून) दोष बाहेर काढले जातात. यात स्नेहन आणि स्वेदन ३ ते ५ दिवस करतात. अर्थात तेही रुग्णाच्या प्रकृतीवरून ठरवले जाते. अभ्यंग करण्याबरोबरच रुग्णाला वाढत्या प्रमाणात तूप प्यायला सांगतात. या स्नेहपानाची चांगली लक्षणे दिसू लागली की मग दहीभात किंवा उडीदवडय़ासारखे पदार्थ रुग्णाला खाण्यास दिले जातात. हा कफकारक आहार आहे. त्याचा योग्य तो परिणाम दिसला की दुसऱ्या दिवशी उसाचा रस पोटभर प्यायला देऊन वमन करवले जाते.

‘सद्यवमना’मध्ये रुग्णाच्या शरीरातील दोष आधीच वाढलेले असतात. त्यामुळे त्यांना शरीरातील कफ वाढण्याची वाट न पाहता थेट मुख्य कर्म करता येते.

विरेचन

पित्तप्रधान विकारांसाठी विरेचन हे कर्म सांगितले आहे. यात तोंडाद्वारे औषध देऊन अधोमार्गाने दोष बाहेर काढले जातात. साध्या भाषेत याला जुलाब करवणे, असेही म्हणता येईल.

बस्ती

वातप्रधान विकारांसाठी ‘बस्ती’ करता येते. काढा किंवा औषधी तेलाचा वापर करून ‘एनिमा’सारखे याचे स्वरूप असते. बस्तीमध्येही अनेक प्रकार आहेत. काही वेळा बस्ती शरीरात राहावी लागते तर कधी ते औषध पटकन बाहेर येणे अपेक्षित असते.

नस्य

नस्य म्हणजे नाकात तेल सोडणे. ‘ऊध्र्वजत्रूगत’ विकार अर्थात मानेच्या वरच्या व्याधी वा शिरोरोगात नस्य प्रामुख्याने केले जाते. पक्षाघातासारख्या रुग्णांनाही नस्य करता येते.

रक्तमोक्षण

रक्तदुष्टीप्रधान व्याधींवर रक्तमोक्षण हे कर्म सांगितले आहे. त्वचारोगांवर ते प्रामुख्याने केले जाते. हे कर्म चार प्रकारे करता येते. रक्त शोषणाऱ्या जळवा (लीच) लावून किंवा सीरिंजने त्या जागचे ५ ते १० एमएल रक्त काढले जाते. यात शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढले जाते. रक्तमोक्षणाचे इतरही दोन मार्ग ग्रंथात सांगितलेले आहेत, पण ते प्रचलित नाहीत.

यातील कोणते कर्म कधी केलेले चांगले याचेही काही नियम आहेत. ऋतूनुसार काळ बदलतात. त्यानुसार कर्म करण्याची वेळही विशिष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. शरद/ वसंत ऋतू असेल तर नस्य सकाळी दिले जाते, तेच हिवाळ्यात दुपारी व ग्रीष्मात संध्याकाळी दिले जाते.

पश्चात कर्म

पूर्वकर्म व प्रधानकर्म (मुख्य कर्म) झाल्यानंतर ‘संसर्जन क्रम’ दिला जातो. याला ‘पश्चात कर्म’ असेही म्हणतात. हा आहार असतो. मंद झालेल्या जठराग्नीचे दीपन करण्यासाठी मंडपेया, विलेपी व ओदन असा संसर्जन क्रम सांगितला आहे. साध्या भाषेत समजून घ्यायचे तर अधिक द्रवपदार्थ असलेला पदार्थ आधी देऊन मग घनपदार्थ वाढवलेला आहार दिला जातो. हा आहार घेताना अग्निदीपन होत जाते.

रुग्णाची व्याधी जुनी झाली असेल तर पोटात औषध घेतल्याने काही प्रमाणात फरक दिसतो, पण तरीही बरे वाटण्यात मर्यादा राहते. अशा वेळी पंचकर्माचा वापर केल्यास अधिक आराम पडू शकतो. मानसिक आजार, मनावरील ताणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमध्येही पंचकर्मे व उपकर्मे करता येतात.

पंचकर्मात आहारविहाराची सांगितलेली पथ्ये मात्र पाळावी लागतात. अपथ्य केल्याने पंचकर्माचा परिणाम कमी होतो किंवा परिणाम होत नाही.